
आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अपघातानंतर डीजीसीएने व्हीएसआरवर कारवाई केली आहे. डीजीसीए व्हीएसआर एव्हिएशनच्या 4 विमानांना ग्राउंड करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या विमानांच्या सुरक्षा लेखापरीक्षणात त्रुटी आढळल्यानंतर डीसीजीएकडून ही कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात डीजीसीए लवकरच अधिकृत निवेदन जारी करण्याची शक्यता आहे. ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवार यांचा अपघात झाला त्या ‘व्हीएसआर एव्हिएशन’विरोधात डीजीसीएने कडक पावले उचलली आहेत. या कंपनीच्या ताफ्यातील 4 विमानांचे उड्डाण तातडीने रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानाच्या सेफ्टी ऑडिटदरम्यान या विमानांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही विमाने जोपर्यंत सर्व निकषांची पूर्तता करत नाहीत, तोपर्यंत ती हवेत झेपावू शकणार नाहीत.

DGCA ने VSR Ventures Pvt Ltd चे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण (ऑडिट) केल्यानंतर कंपनीची चार Learjet 40/45 विमाने तात्काळ प्रभावाने ग्राऊंड केली आहेत. या चारही विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. DGCA ने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, बहु-विद्याशाखीय ऑडिट टीमला विमानाची योग्यता, उड्डाण सुरक्षा आणि फ्लाईट ऑपरेशन्सशी संबंधित मंजूर नियमांच्या पालनामध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. ऑडिटमध्ये देखभाल दुरुस्तीच्या प्रक्रियेतही उणिवा समोर आल्या आहेत. याच अनियमितता लक्षात घेऊन DGCA ने नोंदणी क्रमांक VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI असलेल्या Learjet 40/45 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. जोपर्यंत विमानांच्या योग्यतेचे मानक पूर्णपणे पुनर्संचयित केले जात नाहीत, तोपर्यंत ही विमाने उड्डाण करू शकणार नाहीत.

DGCA ने कंपनीला त्रुटी अहवाल फॉर्म जारी केला असून यातील मूळ कारणांचे विश्लेषण (Root Cause Analysis) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सुरक्षा मानकांशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे DGCA ने स्पष्ट केले आहे. ही कारवाई विमान सुरक्षेबाबतच्या कडक भूमिकेचा भाग म्हणून पाहिली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या विमानाच्या तांत्रिक नोंदींमध्ये मोठी अनियमितता आहे. विमानाने एकूण 5,000 तास उड्डाण केल्याचे सांगितले जाते, मात्र व्हीएसआर कंपनीकडे केवळ 1,800 ते 2,000 तासांच्या उड्डाणाचा अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध आहे. उर्वरित 3,000 तासांच्या प्रवासाचा कोणताही लेखी पुरावा नाही. ही माहिती दडवण्यामागे इंजिनची झीज लपवण्याचा हेतू असू शकतो, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.


