
व्हिडिओ टाकू नको नाहीतर चार पाच दिवसात तुला खलास करीन
हाॅटेल भाग्यश्रीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी, धमकीची क्लिप व्हायरल, सुपारी दिल्याचा दावा
तुळजापूर – आपल्या हटके डायलाॅग आणि चवीमुळे कायम चर्चेत राहणारे हाॅटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना सगळेच ओळखतात. नुकतेच त्यांनी आपले हाॅटेल नवीन जागेत स्थलांतरित केले असून जागा देखील वाढवली आहे. पण आता नागेश मडकेंना धमकी देण्यात आली आहे.
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकू नकोस, आम्हाला तुला जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. तुझे दिवस भरत आले आहेत, अशा शब्दात मडके यांना धमकी देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी हाॅटेलमध्ये एका ग्राहकांना हाॅटेलच्या कामगारांनी मारहाण केली होती. मडके यांच्या पत्नीवर हल्ला केल्यामुळे मारहाण करण्यात आल्याचा दावा, त्यावेळी करण्यात आला होता. त्याचबरोबर याआधीही दोनवेळा हाॅटल भाग्यश्री बंद असताना तोडफोड केल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे अगोदर घडलेल्या घटनांचा आणि धमकीचा संबंध. असण्याची शक्यता आहे. आमच्या हॉटेलचे नाव होत आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील काहीलोक मुद्दामून येथे गोंधळ घालतात. भांडण उकरुन काढतात. आमच्या हॉटेलची बदनामी व्हावी, ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहेत, असे नागेश मडके म्हणाले आहेत. या धमकीची आॅडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. दरम्यान मारहाणीच्या घटना घडत असल्यामुळे नागेश मडके यांनी सुरक्षेसाठी पुण्याहून बॉडीगार्ड्स बोलावले आहेत.
नागेश मडके यांनी धमकी आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे की नाही, याची माहिती मिळू शकलेली नाही. “नाद करतो काय, यावचं लागतंय!” या हटके टॅगलाइनसह हॉटेल भाग्यश्री महाराष्ट्रभर चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.