
हुंडाबळी! सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन
पाच लाख आणि मोटरसायकलसाठी पती करायचा मारहाण, नवऱ्याचा वाढदिवसादिवशीच किरणने केली आत्महत्या
पुणे – वैष्णवी हगवणे प्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पण तोच आता पुण्यात आणखी एक हुंडाबळीची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील बोऱ्हाडेवाडी येथे २६ वर्षीय विवाहितेने सासरकडून ५ लाख रुपये आणि मोटारसायकलच्या सततच्या तगाद्यामुळे व मारहाणीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
किरण दामोदर असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. किरण आणि आशिष चा जून २०२२ मध्ये रितिरिवाजाप्रमाणे मोठ्या थाटात विवाह झाला. विवाह ला सहा महिने होताच आशिषने किरणकडे माहेरहून पाच लाख आणि दुचाकीसाठी पैसे आण असा तगादा लावला. त्यामुळे किरणच्या वडिलांनी एक दुचाकी घेऊन दिली. या दरम्यान त्यांना एक मुलगाही झाला. मुलगा झाल्यामुळे संसार सुरळीत होईल असं वाटत होतं. परंतु, आरोपी आशिष, किरण ला मद्यपान करून मारहाण करायचा. वारंवार सासरच्या मंडळींकडे पैशांसाठी तगादा लावायचा. सासरे अधून- मधून पैसे देत होते. आत्तापर्यंत आपण पाच लाख दिले असल्याचा दावा किरणच्या वडिलांनी केला आहे. सासू सुनंदा दीपक दामोदर ही देखील किरण ला लग्नात काही दिल नसल्याने टोमणे मारायची. हे सर्व किरण ने घरी फोन करून सांगितलं होतं. आई वडिलांनी पिंपरी- चिंचवडमध्ये येऊन किरणची भेट घेतली होती. परत घरी चल अस ही म्हटल होत. तरीही किरण माहेरी गेली नाही. पण आशिष किरणला त्रास देतच होता. १८ जुलै रोजी किरण आशिष दामोदर हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी आशिषचा वाढदिवस होता. वाढदिवसा दिवशी दोघांमध्ये केक वाटण्यावरून वाद झाला आणि रूममध्ये जाऊन किरणने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर किरणला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, परंतु तिथं मृत घोषित करण्यात आलं. आत्महत्येनंतर पोलिसांनी माहेरच्या व्यक्तींना याबाबत माहिती दिली. किरणने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिषने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर किरण दामोदर यांचे वडील – संजय दोंड यांच्या तक्रारीनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी किरणचा पती आशिष दामोदर, सासरे दीपक दामोदर, सासू सुनंदा दामोदर यांच्यावर हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आशिष दामोदर याला बेड्या ठोकल्या आहेत. तर सासू सुनंदा आणि सासरे दीपक हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अधीर या दीड वर्षांच्या मुलाला मागे ठेवून किरणने टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. फरार सासू सासऱ्याला त्वरित अटक करावी आणि या सगळ्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी किरणच्या वडिलांनी केली आहे.