
टोल मागितल्याने कर्मचा-याला ट्रकखाली चिरडले
अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी गंभीर जखमी, आरोपी चालक फरार
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ट्रक चालकाने टोल कर्मचा-याच्या अंगावर गाडी घालत हत्येचा प्रयत्न केला आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, गंभीर जखमी कर्मचाऱ्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. बल्लारशाहहून चंद्रपूरकडे येणारी टाटा एस वाहन चालक टोल बचावण्याच्या उद्देशाने थेट लाईन क्रॉस करत टोल न भरता पुढे जात होता. यावेळी टोल ऑपरेटर संजय अरुण वांझारे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी थांबवण्याऐवजी संजय यांच्या अंगावर गाडी घातली. संजय हा विसापूर टोल नाक्यावर कॅम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. जखमी कर्मचार्याला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची तक्रार बूथ व्यवस्थापकाने बल्लारपूर पोलिसात दाखल केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून, आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनांमुळे टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासन व टोल व्यवस्थापनाने या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
या घटनेने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला गेला आहे. अनेकांनी या क्रूर कृत्याला हत्येचा प्रयत्न ठरवत चालकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये टोल कर्मचाऱ्यांवर वाहनांनी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.