
राज्यात बहुचर्चित अशा नाशिक मतदारसंघातून महायुतीत नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याचीच चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. त्यातच छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं ही जागा नेमकी कोणाकडे जाणार यासाठी तर्क लावले जात असतानाच आता या मतदारसंघानं पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरीही त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं खळबळ उडालीय. दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतंय, त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब इथं समोर येत आहे. एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते तर भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज येथील जागेसाठी बाशिंग बांधून बसलेले असतानाच दुसरीकडे दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.