मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच! देव आडवा आला तरी मराठय़ांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे मनोज जरांगे यांनी सरकारला ठणकावले. मराठा समाजबांधवांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे यांच्या आज शुक्रवारी परभणी जिह्यातील सेलू तसेच सोनपेठ येथे सभा झाल्या. यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात दिलेला शब्द फिरवल्याबद्दल संताप व्यक्त केला. उपोषण सोडविताना सरकारचे मंत्री, अधिकारी चर्चा करण्यासाठी आले होते.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लिखापढी झाली आहे. कालही मंत्री तोच कागद घेऊन आले होते. त्या कागदावर जे लिहिले आहे त्याचीच पूर्तता करा, अशी आमची मागणी आहे आणि चार शब्द आहेत त्यात तसूभरही बदल होणार नाही, असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर अगोदर मराठय़ांचा समावेश ओबीसीत करा आणि नंतर वाट्टेल तेवढी मर्यादा वाढवा, असा इशाराही त्यांनी दिला. नोटिसा देऊन पुन्हा तोच प्रयोग करण्यात येत आहे. सरकारने असे धाडस करू नये, अन्यथा त्यांना राज्यात फिरणे मुश्कील होईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. आरक्षण मिळेल या आशेने मराठा लोक सभेला गर्दी करत आहेत. सरकारच्या नोटिशीला घाबरून ही लाट ओसरणार नाही. त्यामुळे सरकारने आता भानावर यावे, त्यांच्याकडे दोन दिवस आहेत. येत्या 48 तासांत सरकारने आरक्षण देऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.