
न्यायालयातील कौटुंबिक वादातून त्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.अतिश अंकुश मरगज (वय ३०) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. या घटनेत निकिता आतिश मरगज (वय २६,) ही गंभीर जखमी झाली आहे.

हा प्रकार करंजविहीरे गावात बाजीराव कोळेकर यांच्या बिल्डिगजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडला. याबाबत संभाजी बबन कोळेकर यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पुतणी हिचा अतिश मरगज याच्याशी झाला होता. परंतु, त्यांच्या पटत नसल्याने त्यांचा कौटुंबिक न्यायालयात वाद सुरु होता. सध्या निकिता ही आईवडिलांकडे मुंबईला राहते. न्यायालयाच्या कामासाठी निकिता ही गावी आली होती.

आपल्या काकाच्या घरी थांबून ती सायंकाळच्या गाडीने मुंबईला जाणार होती. त्यासाठी गाडीची वाट पहात उभी होती. त्यावेळी अतिश मरगज हा तेथे आला. त्याने आपल्याकडील कोयता बाहेर करुन निकिता हिच्या डोक्यात, हातावर वार करुन तिला गंभीर जखमी केले. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पकडून अतिश याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव तपास करीत आहेत.


