
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाची पार्किंगच्या वादातून हत्या
हत्येचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल, पार्किंग की दुसरा वाद, नक्की काय घडले? वाचा संपूर्ण प्रकरण सविस्तर
दिल्ली – प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची किरकोळ कारणावरून हत्या झाली आहे. निजामुद्दीनमध्ये पार्किंगवरून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याचे सीसीटीव्ही देखील समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुमा कुरेशीचा भाऊ आसिफ दररोजप्रमाणे आपल्या कामाहून घरी आला. यावेळी त्याने बघितले की, शेजाऱ्यांनी त्याच्या घराच्या दरवाजाबाहेरच स्कूटी लावली आहे. यानंतर त्याने शेजाऱ्यांना त्यांची स्कूटी काढण्यास सांगितली. मात्र, शेजाऱ्यांनी गाडी काढणे सोडा उलट याला शिव्या घालण्यास सुरूवात केली. यावेळी काही लोक देखील जमली. मात्र, काही कळण्याच्या आतच हुमाच्या भावावर दोघांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आसिफला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यापूर्वीही पार्किंगच्या वादावरून आरोपीचे माझ्या पतीशी भांडण झाले होते. गुरुवारी रात्री माझे पती कामावरून घरी परतले तेव्हा शेजारच्याची स्कूटी घरासमोर पार्क केलेली होती. त्याने शेजाऱ्याला ती काढण्यास सांगितले. पण स्कूटी काढण्याऐवजी शेजाऱ्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रकरण इतके बिघडले की कोणीतरी त्याला धारदार वस्तूने मारले, असा आरोप आसिफच्या पत्नीने केला आहे. या हत्याकांडात एका महिलेची भूमिकाही समोर आली आहे. आसिफ कुरेशीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, भांडणादरम्यान एक महिला हल्लेखोरांना सतत चिथावत होती. ती “मार मार मार” असे ओरडत होती, ज्यामुळे आरोपींचा राग अधिक भडकला. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव शैली असून, तिचा हल्लेखोरांशी जवळचा संबंध असावा असा अंदाज आहे.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि हत्येत सहभागी असलेल्या दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी भाऊ असून गौतम आणि उज्ज्वल अशी त्यांची नावे आहेत. हा वाद फक्त पार्किंगवरून झाला होता की त्यांच्यात जुने वैमनस्य कि वाद होते हे शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलिस करत आहेत.