
वडिलांनी केली विवाहित मुलीची आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या
हातपाय बांधून विहिरीत फेकले, हत्येनंतर वडील स्वतः पोलिस ठाण्यात हजर, या कारणामुळे संताप अनावर झाला आणि....
नांदेड- नांदेड जिल्हयातील उमरी तालुक्यात पित्याने आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑनर किलिंगाच्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांसह तीन जणांना बेड्या ठोकून अटक केली आहे.
मृत तरुणी संजीवनी सुरने ही उमरी तालुक्यातील बोरजुन्नी येथे राहणारी होती. एक वर्षापूर्वी तिचा विवाह गोळेगाव येथील सुधाकर कमळे याच्यासोबत झाला होता. तिच्या वडिलांनी मोठ्या धुमधडाक्यात तिचे लग्न लावून दिले होते. मात्र संजीवनीचे विवाहापूर्वी गावातीलच लखन बालाजी भंडारे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्यांच्यामध्ये फोनवरुन बोलणे, भेटणे सुरु होते. सोमवारी तो तिला भेटायला तिच्या सासरी गेला होता. तेव्हा सासरच्या लोकांनी संजीवनी आणि लखन या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि ते पाहून ते संतापले. त्यांनी लखनला पकडून ठेवले आणि संजीवनीच्या वडिलांना, मारुती सुरणे यांना तिथे बोलावले. मुलीचे प्रेम प्रकरण पाहून वडील देखील संतापले. संतप्त मारूती हे संजीवनी आणि तिच्या प्रियाकराला घेऊन गावाकडे गेले. यावेळी त्यांच्यासोबत मुलीचे काका आणि आजोबाही होते. गावाकडे येत असताना मारूती यांनी संजीवनी आणि तिच्या प्रियकराचा हातपाय बांधले आणि त्यांना विहीरात फेकून देत त्यांची हत्या केली. नंतर त्यांनी स्वत:च पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या घटनेची कबूली दिली.यानंतप पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेत अटक केली. तसेच घटनास्थळ गाठून रात्री उशिरापर्यंत मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा, दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भयंकर घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तपासाच्या अनुषंगाने या प्रकरणातील आणखी काही बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. सध्या आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.