
प्रेमसबंध तोडल्यामुळे महिला धर्मगुरुने केली भक्ताची हत्या
व्यवसायिकाची गोळ्या घालून हत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, अफेअर संपवल्याने चिडली आणि थेट गोळीच घातली
हाथरस – हाथरस येथील कचौरा येथील बाईक शोरूम मालक स्वामी अभिषेक गुप्ता यांची २६ सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. महामंडलेश्वर म्हणून ओळख मिळवलेल्या पूजा शकुन पांडे आणि तिच्या पतीने अज्ञात शूटरकडून आपल्याच भक्ताची हत्या घडवून आणल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. आज अखेर तिला अटक करण्यात आली आहे.
अभिषेक गुप्ता बाईक शोरूमचे मालक होते, त्यांची २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या कटात पूजा शकुन पांडेचं नाव समोर आलं होतं. याप्रकरणी तिच्या पतीला अटक झाली, मात्र ती फरार होती, अखेर आता तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, पैशाच्या वादातून या जोडप्याने व्यावसायिक अभिषेक गुप्ताची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. दरम्यान पीडितच्या वडिलांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, अभिषेकचे पूजा शकुन पांडेशी प्रेमसंबंध होते आणि जेव्हा तो बाहेर पडू इच्छित होता तेव्हा त्याची हत्या करण्याची योजना आखली आली. पूजा शकुन पांडे यांनी आपल्यापेक्षा बरेच वर्षे लहान असलेल्या अभिषेक गुप्ताशी अभ्यासाच्या बहाण्याने घरी भेटीगाठी सुरू केल्या. हळूहळू हे नाते अध्यात्माच्या मर्यादेतून बाहेर पडून अवैध संबंधात बदलले. पण त्यानंतर पूजाने अभिषेकडे शोरूम मध्ये भागीदारी देण्याची मागणी केली. जेव्हा अभिषेक पूजाच्या या हट्टामुळे त्रस्त होऊन तिच्यापासून दूर होण्यासाठी त्याने पूजाचा नंबर डिलीट केला, सोशल मीडियावर ब्लॉक केले आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण यामुळे ती प्रचंड संतापली, आणि तिने अभिषेकाची हत्या केली. अभिषेक गुप्तावर गोळीबार करण्यात सहभागी असलेल्यांपैकी एक मोहम्मद फजलला पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याने अभिषेकची हत्या करण्यासाठी सुपारी मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी फरार असलेल्या पुजाला बेड्या ठोकल्या.
अखिल भारतीय हिंदू महासभाची पूजा शकुन पांडे ही पदाधिकारी आहे. यापूर्वी काही लोकांनी या महासभेचे अध्यक्ष आणि सचिव बनावट असल्याचा दावा केला होता. ती २०१९ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने प्रसिद्धीझोतात आली होती.