
जाब विचारणाऱ्या महिला कामगाराला मालकिनीने कारने चिरडले
अपघातात महिला कामगार गंभीर, १२ तास काम करा नाहीतर घरी बसा कंपनीचे फर्मान, व्हिडिओ व्हायरल
पालघर – पालघरमधील एका कंपनीत अचानक कामावरुन कमी केल्याने कामगारांनी जाब विचारला असता कंपनीच्या मालकीनीने कामगारांच्या अंगावर गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
पालघर पूर्वेच्या वेवूर येथील मस्तांग इंटरप्राइजेस या कंपनीतील कामगारांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले होते. १२ तास काम करा, नाहीतर घरी बसा असं फर्मान कंपनीने सोडलं होतं. त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या मालकीणीशी बोलण्यासाठी तिची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान संतप्त झालेली कंपनीची मालकीण नाजनीन कात्रक यांनी कामगारांच्या अंगावर कार घातल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मालकिणीने गाडी अंगावर घातल्याने विद्या यादव ही कामगार महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी सुरुवातीला पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली होती. मात्र काही काळानंतर कंपनी मालकिणीच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अपंग असलेल्या कंपनी मालक नाजनीन यांनी ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून स्वतः कारचा ताबा घेतला. त्यानंतर कामगारांच्या अंगावर कार घातली. जखमी कामगाराला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मस्तांग इंटरप्राइजेस ही सॉक्स बनवणारी कंपनी असून, या कंपनीत वर्षांपासून काम करणाऱ्या ४५ कामगारांना ८ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी महिलांना दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत काम करण्याच्या सूचना दिल्यावर कामगारांनी विरोध दर्शविला. त्यामुळे त्यांना कामावरुन कमी करण्यात आले होते.
कामगारांनी आपल्याला कुठली पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाला फोन करून विचारले. तुम्हाला कामावर घेण्यास व्यवस्थापकाकडून मज्जाव करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कामगारांनी गाडी अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता.