
शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे कंपनीच्या कामाच्या ठेकेदारीच्या वादातून एका व्यक्तीचा कोयत्याने खून करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यापूर्वी अनेकदा हाणामारी, खंडणी, फसवणूक यांसारखे गुन्हे दाखल असलेला आणि एका वर्षासाठी तडीपार झालेला सराईत गुन्हेगार पिंटू उर्फ संतोष दरेकर आणि त्याचा भाऊ विक्रम दरेकर या दोघांनी मिळून हा हल्ला केला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सणसवाडी येथील रोशन दरेकर यांचे गावातील प्रगती इन्फ्रा कंपनीमध्ये जेसीबीने काम सुरू आहे. रोशन हे त्यांच्या कारमधून (एमएच १२ डब्ल्यूपी ७७७२) कंपनीत जात असताना, अचानक नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या थार कारमधून पिंटू दरेकर आणि लाल रंगाच्या कारमधून (एमएच १२ जेयू ७८३५) त्याचा भाऊ विक्रम दरेकर यांनी रोशनच्या कारला वाहने आडवी लावली. पिंटू दरेकर हातात कोयता फिरवत खाली उतरला.

पिंटू आणि विक्रम यांनी रोशनला कारमधून खाली ओढून त्याच्या कारची काच कोयत्याने फोडली.त्यानंतर पिंटूने रोशनला “पुन्हा प्रगती इन्फ्रा कंपनी आणि सणसवाडीतील कोणत्याच कंपनीत काम करायचे नाही, पुन्हा येथे कोठे दिसला तर गोळ्या घालून मारून टाकीन,” अशी धमकी देत कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. मात्र, रोशन त्यांच्या तावडीतून सुटले आणि त्याने पोलिसांना फोनवरून माहिती दिली. शिक्रापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रोशनला पोलीस ठाण्यात आणले. रोशन हिरामण दरेकर (वय २४, रा. डोंगरवस्ती सणसवाडी) यांच्या फिर्यादीवरून संतोष उर्फ पिंटू रंभाजी दरेकर व विक्रम रंभाजी दरेकर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी पिंटू दरेकरची नंबर नसलेली थार कार जप्त केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर करत आहेत.


