Latest Marathi News
Ganesh J GIF

अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांनी मौन सोडलं

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या सगेसोयरे मागणीवर टीका केली. तसेच सरकारकडून नोंदी शोधून ज्यांना नवे ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहेत ते रद्द करावेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.याशिवाय प्रकाश आंबेडकर ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाच्या बचावासाठी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला होता. आमच्यावर आता येत्या 20 जुलैला आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. ते उपोषण कठोर करणार आहोत”, अशीदेखील भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मांडली.

“मराठा समाजाला गोडगोड बोलायचं हा देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा डाव दिसतो. ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे, देवेंद्र फडणवीस सारख्या एवढ्या मोठ्या नेत्याने इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे? महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती, तेव्हापासून सगळे विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब, तुम्ही नेमका तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती की प्रत्येकाला मराठ्यांविषयी द्वेष ओकायला लावताय? कारण प्रकाश आंबेडकर साहेब प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून औषध घालतील, असं ते सांगायचं. पण तेच आज विरोधात बोलत आहेत. इतकं शोकिंग वाटतंय. आंबेडकर साहेब पण म्हणाले, सगे सोयऱ्याची अंमलबजावणी करू नका, त्यांचा पक्ष म्हणतो की नोंदी रद्द करा. मराठ्यांची एससी, एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाही”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

“देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंभाळ करायचं आहे का? नेमकं तुमचं काय चाललंय हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचा. म्हणजे तुम्ही आमच्या सोयऱ्यांना त्रास देणार. फडणवीस साहेब, तुमचे पण राज्यात सोयरे आहेत. आम्ही त्यांना त्रास देत नाहीत. एवढा मोठा उच्चदर्जाचा भाजपचा नेता मराठ्यांविषयी डाव करतो? मला तर फडणवीस साहेबांचं आश्चर्य वाटायला लागलंय. वारंवार एकच शब्द काढायचा की, शरद पवारांनी काही दिलं नाही. त्यांच्याकडे मोर्चा वळवला. पण ते आता कुठे सत्तेत आहेत? साष्ट पिंपळगावच्या आंदोलनावेळी त्यांच्याकडेच आमचा मोर्चा होता. दोन टप्प्यात दोन भूमिकेत वागणाऱ्या अवलादी आमच्यात नाहीत. सत्तेत तुम्ही आहात. त्यांनी काय नुकसान केलं आम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्हाला करायचंय का आता?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.“देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही. परत म्हणता, मला टार्गेट केलं जातं. तूम्ही तसे वागतात. तुमच्या बैठकीला आलेले नेते, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. फडणवीस साहेब काय करतात मला माहीत होतं. बैठकीला एकदा आमचं शिष्टमंडळही गेलं होतं. सगळे नेते बोलायला बंद झाले, गोरगरिबांच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही. आज आमच्यावरच वेळ आहे. फडणवीस साहेब, तुम्हाला आमच्या अंगावर घालतील. उद्या हेच फडणवीस आम्हालाही तुमच्या अंगावर घालतील. ओबीसींच्या सर्व नेत्यांना आणि प्रकाश आंबेडकर यांना, सगळ्यांनाच कळकळीने बोलतोय. मला फडणवीस साहेब माणूस विचित्र दिसतोय”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

“आपण गरिबांसाठी लढू, त्यांच्या फाश्यात फासून गोरगरीब जनतेला काहीच मिळणार नाही. माझी खरंच विनंती आहे, गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब दलितांना आपण एकत्र आणलं पाहिजे, आपण आपल्यालाच न्याय देऊ शकतो”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं. यावेळी मनोज जरांगे यांना प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत एकत्र यायला पाहिजे का? या प्रश्नाचं उत्तर दिलं. “ते सोबत येणार आहेत की नाही मला माहीत नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही. आताची वक्त्यवे बघितली तर गरिबांना कसा न्याय मिळणार? न्याय देण्यासाठी एकत्र यावं लागेल. ते बोलायला तयार नाहीl. अंबलबजावणी रद्द करा म्हणतात.हे आम्हाला अपेक्षित नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!