
पुण्यात सुरक्षा रक्षकांकडून फ्लॅट मालकाला बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत, कुठे घडली घटना?
पुणे – पुण्यातील नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एका महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नावाच्या महिलेवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पती आणि मुलांसह नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीमध्ये गेल्या १० वर्षांपासून राहतात. फिर्यादी यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी म्हणजे ८ एप्रिलला फिर्यादी यांचे पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. त्याठिकाणी नांदेड सिटीचे सिक्युरिटी गार्ड यांनी फिर्यादी यांच्या पतीच्या गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले. तेव्हा फिर्यादी या त्यांच्या मुलासह सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड घेवून गेटवर गेले. यावेळी गेटवर फिर्यादी यांच्या पतीशी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षकांनी वाद घालून अरेरावीची भाषा केली. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा पुढे सरसावला त्यावेळी तिथे असणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांनी त्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे. या घटनेमुळे सोसायटीमधील सुरक्षारक्षकांच्या एकूणच वर्तनावर आणि त्यांना असलेल्या अधिकारांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या सुरक्षारक्षकांवर रहिवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते, त्यांच्याकडूनच जर अशा प्रकारे दादागिरी आणि मारहाण होत असेल, तर रहिवाशांनी नेमके कोणावर विश्वास ठेवावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमुळे आता पोलीस प्रशासन किंवा संबंधित सोसायटीचे व्यवस्थापन मंडळ या सुरक्षारक्षकांवर काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या मारहाणीच्या घटनेने नांदेड सिटी परिसरात आणि पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.