फ्लॅट बुकींग करण्यासाठी 38 लाख रुपये घेऊन बांधकाम व्यावसायिकाच्या खोट्या सह्या करुन बनावट दस्तऐवज तयार करुन पैशांचा अपहार केला. याप्रकरणी हडपसर येथील नमो डेव्हलपर्सच्या सेल्स मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सप्टेंबर ते नोव्हेंबर 2019 मध्ये नमो डेव्हलपर्स यांच्या हडपसर येथील बांधकाम साईटवर घडला आहे. याबाबत माधुरी किरण फुलपगार (वय-56 रा. महंमदवाडी रोड, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. यावरुन नमो डेव्हलपर्सचे सेल्स मॅनेजर अजय रघुनाथ यादव (रा. ब्रह्मा अॅव्हेन्यु बिल्डींग, कोंढवा बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420, 467, 471, 120 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नमो डेव्हलपर्सच्या हडपसर येथील गृहप्रकल्पामध्ये दोन फ्लॅट बुक केले होते. त्यासाठी त्यांनी सेल्स मॅनेजर अजय यादव याला रोख 37 लाख 99 हजार 936 रुपये दिले होते. तसेच एक लाख रुपयांचा चेक यादव याला दिला होता. याशिवाय फ्लॅटच्या पार्किंग व इतर चार्जेससाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे दोन चेक दिले होते. मात्र, आरोपीने हे चेक बँकेत जमा केले नाहीत व परत देखील केले नाहीत.
पैसे घेऊन आरेपीने फिर्यादी यांना फ्लॅट खरेदी करुन दिला नाही. आरोपी यादव याने बांधकाम साईटचे बिल्डर सुनील रांका यांच्या खोट्या सह्या करुन बनावट दस्तऐवज तयार करुन फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांचा अपहार केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.