नाशिक दि २७(प्रतिनिधी)- नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून सोबत राहणे असह्य झाल्याने पतीचा खून करुन पत्नी फरार झाली होती.पण अखेर त्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
नंदाबाई दिलीप कदम असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर दिलीप रंगनाथ कदम असे या मृत पतीचे नाव आहे. नंदाबाई दिलीपची दुसरी पत्नी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील माळी गल्ली-कोळीवाडा रस्त्यावर एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पोलीसांनी घरात पोटात धारदार शस्त्राने वार केलेला मृतदेह आढळला. त्यानंतर पोलीस तपासात पती-पत्नी मधील वादातून पत्नीनेच ही हत्या केल्याचे समोर आले. पण खून करुन नंदाबाई दोन दिवसांपासून फरार असल्याने तिच्यावरचा संशय वाढला. अखेर तिला येवल्यातील मैत्रिणीच्या घरातून पोलीसांनी अटक केली आहे.
पतीच्या जाचाला मी कंटाळले होते. मला पतीसोबत राहणे असह्य झाले होते. त्यातून मी पतीचा खून केल्याची कबुली नंदाबाईने दिली आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक व प्रभारी सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे) आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात पोलिसांना यश आले आहे.