माजी आमदार महादेव बाबर आणि रवींद्र धंगेकरांचा शिंदे गटात प्रवेश?
ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटाबरोबर काँग्रेसलाही धक्का?, शिंदे गटाची ताकत वाढल्याने भाजपा, राष्ट्रवादी अस्वस्थ?
पुणे- विधानसभा निवडणूकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर अनेक नेत्यांची महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश घेण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यातच शिंदे गटाने आॅपरेशन टायगर सुरू केले असून अनेक आजी माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसणार आहे. आता ठाकरे गटाला पुण्यात धक्का बसणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसायला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक माजी अमदार, पदाधिकारी महायुतीच्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता शिवसेनेतील पुण्यातील हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर त्यांचा मुलगा आणि शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे कसबा पेठ मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार महादेव बाबर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यासोबत २५ माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली आहे. पुण्याच्या हडपसर विधानसभेत महाविकास आघाडी कडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून महादेव बाबर इच्छुक होते. हडपसरची जागा शरद पवार गटाकडे गेल्याने महादेव बाबर यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे काम इथून पुढे करणार नाही. तसेच आघाडीबरोबरही राहणार नाही, अशी ठाम भूमिका महादेव बाबर यांनी घेतली होती, त्यातच महायुतीला मोठे यश मिळाल्यामुळे बाबर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महादेव बाबर हे २००९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर हडपसर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बाबर यांनी ठाकरेंना साथ देण्याचे ठरवले होते, पण आता ते लवकरच शिंदे गटात जाणार असल्यामुळे हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान पुण्यात शिंदे गटाची ताकत वाढत असल्यामुळे महायुतीतील भाजप व अजित पवार गटाचे पदाधिकारी मात्र अस्वस्थ झाले आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार धंगेकर देखील लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात धंगेकरांएवढा आक्रमक नेता काँग्रेसकडे नाही. त्यामुळे धंगेकर जर खरचं शिवसेनेमध्ये गेले तर आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची अवस्था बिकट होऊ शकते. तर शिंदे गटाला बळ मिळणार आहे.