बीड – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. असे असताना आता चार आमदारांची नावे चर्चेत आल्याने खळबळ उडाली आहे.
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचा वातावरण ढवळून निघाले आहेस. विरोधकांनी, शनिवार २८ डिसेंबरला बीड येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सर्वानाच येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार आहेत आणि ते मी दाखवले आहेत. या दोघांची दहशत,व्यवहार आणि बाकी सगळे धंदे एकत्र आहेत. जगमित्र शुगर नावाची कंपनी आहे त्यात त्याच्या नावावर जमीन आहे आणि त्याच कंपनीमध्ये राजश्री मुंडे या देखील सहभागी आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात 1222 बंदुकीचे परवाने आहेत. हे परवाने कशासाठी दिले आहेत? असा सवाल त्यांनी केला. परवाना दिलेल्या या यादीत वाल्मिक कराड यांचं नाव दोनदा आले आहे, असा दावा त्यांनी केला आहे. आता अंजली दमानिया यांनी ट्वीट करत वाल्मिक कराडसह चार आमदारांची नावे घेतली आहे. दमनिया यांनी म्हटले की, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला छळून जमिनी बळकावल्या असतील, खंडणी मागितली असेल किंवा कार्यकर्ते बंदूक दाखवून दहशत पसरवत असतील तर आमच्या 9235353500 ह्या नंबर वर कळवण्याचे आवाहन केले आहे. सगळी माहिती आणि माहिती देणाऱ्याचे नावे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येतील असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात विरोधकांनी जरुर जावे, परंतू राजकारण आणि पर्यटन करु नये अशी टीका केली आहे. त्यावर अंजली दमानिया यांनी देवेंद्रजींनी पर्यटन म्हणून तरी बीडला एकदा जावे, तेथे त्यांचे आता मित्र झालेल्या धनंजय मुंडे यांची किती दहशत आहे हे एकदा पाहावे, असे म्हटले आहे.