
नवीन घर घेण्यासाठी होम लोन करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेने एका व्यक्तीची 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.हा प्रकार मार्च 2023 ते एप्रिल 2023 या कालावधीत मांजरी बुद्रुक येथे घडली आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सचिन रमेश सुगंधी (वय-43 रा. केशवनगर रोड, मांजरी बुद्रुक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुवर्णा विश्वनाथ चिपाडे (वय-33 रा. वाघोली) यांच्या विरोधात आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांचे ओळखीचे इन्फ्रास्ट्रक्चर चे बांधकाम व्यावसायिक किरण हिंगणे यांच्या मांजरी येथील केशवनगर रोडवरील वृंदावन पार्क या बांधकाम प्रोजेक्टमध्ये फ्लॅट विकत घेयचा होता. फ्लॅट घेण्यासाठी होम लोनची आवश्यकता होती.

त्यावेळी बिल्डर किरण हिंगणे यांनी फिर्यादी यांना आरोपी सुवर्णा चिपाडे यांच्याकडे पाठवले.चिपाडे या ICICI बँकेत कामाला आहेत. फिर्यादी यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये चिपाडे यांची भेट घेऊन होम लोन बाबत सांगितले.त्यावेळी चिपाडे यांनी फिर्य़ादी यांना होम लोन करुन देण्याचे आश्वासन दिले.

तसेच होम लोन मंजूर करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन, लोन अॅप्लीकेशन फी, बँकेत खाते काढण्यासाठी व होम लोन मंजुर करण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून 70 हजार रुपये घेतले.त्यानंतर होम लोन मंजुर न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांधले करीत आहेत.

