गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात ; पोलिसांकडून ११ गुन्हे उघडकीस
लॅपटॉपच्या लोकेशनवरुन बंगलुरु येथून आरोपीला पकडून स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. सुरेश कुमार पांडुरंगन सेरवई (वय ५०) आणि सेंथील कुमार महालिंगन (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सुरेशकुमार यांच्या विरुद्ध मुंबईतील कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात २ व धारावी पोलीस ठाण्यात एक अशा तीन गुन्ह्याची नोंद आहे. सेंथील याच्यावर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.स्वारगेटजवळ पार्क केलेल्या फॉरच्युर्न गाडीची काच फोडून चोरट्यांनी १ लाख रुपयांचा अॅपल कंपनीचा लॅपटॉप, एअर पॉड असलेली बॅग चोरुन नेली होती. सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, तांत्रिक विश्लेषण अंमलदार प्रतिक लाहिगुडे, हवालदार दिनेश भादुर्गे, संदीप घुले यांनी करुन लॅपटॉपच शोध घेतला असता त्या लॅपटॉपचे लोकेशन बंगलुरु येथे असल्याचे दिसून आले. त्यावरुन पोलिसांनी बंगलुरु पोलिसांशी संपर्क साधून सुरेश कुमार याला ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांनी बंगलुरु येथे जाऊन सुरेशकुमार सेरवई याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे तपास केला असता त्याने २ साथीदारांच्या मदतीने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ११ गाड्यांच्या काचा फोडून आतील साहित्य पळविल्याचे सांगितले. त्यात स्वारगेट ५, खडक २, चंदननगर २, डेक्कन व येरवडा प्रत्येकी एक असे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा अॅपल कंपनीचा व डेल कंपनीचा लॅपटॉप जप्त केला आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांदे, सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस हवालदार भांदुर्गे, तनपुरे, मोराळे, पोलीस अंमलदार लाहीगुडे, घुले, शेख, पवार, चव्हाण, खेंदाड, टोणपे, शिंदे, दुधे यांनी ही कामगिरी केली आहे.