
दुस-या जातीतील तरुणावर प्रेम केल्याने मुलीची हत्या
वडिल आणि काकांनी केली मुलीची हत्या, एका मेसेजेमुळे झाला हत्येचा उलगडा, चंद्रीकासोबत नेमकं काय घडल?
अहमदाबाद – गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील थराडमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या वडिलांनी आणि काकांनी मिळून मुलीची हत्या करून तिचे अंत्यसंस्कार केले असल्याची खळबळजनक माहिती समोर आली.
चंद्रिका चौधरी असे हत्या करण्यात आलेल्या तरूणीचे नाव आहे. तिला डाॅक्टर होण्याची इच्छा होती. चंद्रिका चौधरीची थराडच्या वडगमदा गावातील हरेश चौधरीसोबत प्रेम संबंध होते. पण जुन्या विचारसरणीच्या वडील आणि काकांना हे मान्य नव्हते. चंद्रिका चौधरी पालनपूरमधील एका खाजगी वसतिगृहात राहून नीट परीक्षेची तयारी करत होती. या दरम्यान, एके दिवशी ती हरेश चौधरीच्या गाडीने पालनपूरला गेली आणि वाटेत झालेल्या संभाषणानंतर दोघांमध्ये फोनवर सतत संपर्क झाला आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. हे चंद्रीकाच्या घरी समजल्यानंतर चंद्रिका चौधरी हिचे वडील सेधाभाई आणि काका शिवाभाई पटेल यांनी तुला पुढे न शिकण्यास सांगितले, आणि घरी घेऊन गेले. यावेळी चंद्रीकाने हरेशला मेसेज करत कुटुंब आमचे नाते स्वीकारणार नाही आणि जबरदस्तीने लग्न करेल, म्हणून त्याने तिला आपल्यासोबत घेऊन जावे, असे सांगितले. तिने मेसेज पाठवल्यानंतर काही तासांनी तिचा मृतदेह तिच्या घरी सापडला होता. सुरुवातीला ती आत्महत्या असल्याचं वाटत होतं, परंतु चंद्रिकाच्या मेसेजच्या आधारे हरेश चौधरी यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने पोलिसांना चंद्रिकाला हजर करण्याचे आदेश दिले, त्यानंतर तपासात चंद्रीकाचा खून झाल्याचे उघड झाले. चौकशीदरम्यान काकांनी वडिलांसह चंद्रीकाचा खून केल्याची कबुली दिली.
वडील सेधाभाई पटेल आणि काका शिवरामभाई पटेल यांनी घटनेच्या दिवशी चंद्रिकाला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर स्कार्फने गळा दाबून हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी, तिचा गावातील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.