
‘मला १० लाख रु दे, नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव’
घायवळ टोळीच्या निशाण्यावर असलेल्या गुंडावर पोलिसांचा मोक्का, कोथरूड गोळीबार घटनेत धक्कादायक खुलासा, घायवळ पुन्हा वादात?
पुणे – महाराष्ट्रात सध्या निलेश घायवळवरून वादंग निर्माण झाले आहे. सरकारमधील मंत्री देखील घायवळवरून वादात सापडले आहेत. पण आता पुण्यात आणखी एक कुख्यात गुंडावर मोक्का लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे याचेही घायवळ कनेक्शन आहे.
पुण्यातील घायवळ टोळीचा “प्रतिस्पर्धी” असलेल्या संतोष धुमाळ याच्यावर मोक्का दाखल करण्यात आला आहे. संतोष धुमाळ हा एकेकाळी निलेश घायवळ टोळीतला सक्रीय सदस्य होता. त्याच्यावर आतापर्यंत १६ गुन्हे दाखल आहेत. आता १० लाखांच्या खंडणी प्रकरणी धुमाळवर मोक्का दाखल केला आहे. आखाडे नावाच्या तरुणाने याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २०२१ मध्ये आखाडे हा धुमाळ गँग सोबत होता. एका गुन्ह्यात आखाडे याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांना त्याने धुमाळ बद्दल माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी रात्री १ वाजता आखाडे याला धुमाळने व्हिडिओ कॉल केला आणि “तु कोठे आहेस, मला भेटायला ये, तुझ्यामुळे मला केसमध्ये अटक झाली, त्यामुळे तु मला 10 लाख रु दे, नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव”, अशी धमकी दिली. प्रथम ही बाब आखाडे यांनी दुर्लक्षित केली, मात्र ४ सप्टेंबर रोजी पुन्हा धुमाळने फोन करून खंडणीची मागणी केली. त्यानंतर तो आपल्या साथीदारांसह शास्त्रीनगर (कोथरूड) येथे पोहोचला आणि दहशत निर्माण करून निघून गेला. या घटनेनंतर अखेर आखाडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे संतोष धुमाळ हा एकेकाळी निलेश घायवळच्या टोळीत सक्रिय होता. मात्र काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि धुमाळने गँग सोडली. यानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये गँगवार सारखी स्थिती आहे. विशेष म्हणजे कोथरूडला १७ तारखेला घायवळ टोळीला संतोष धुमाळवर हल्ला करायचा होता, पण त्यानी नशेत प्रकाश धुमाळवर गोळीबार केला होता.
या संपूर्ण प्रकरणी कोथरूड पोलिसांनी मोक्का अंतर्गत संतोष धुमाळ आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपायुक्त (झोन ३) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पण यामुळे पुन्हा एकदा घायवळ टोळी चर्चेत आली आहे.