सरकार पडले, बरे झाले मंत्री फक्त पैसे खात होते’
या नेत्याच्या आरोपामुळे खळबळ, वरिष्ठांकडुन सर्व ठिक असल्याचा दावा
मुंबई दि २७ (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला आहे,कारण पक्षाचे सगळे मंत्री अडीच वर्षे फक्त पैसे खात होते. कोणताही कार्यकर्ता भेटायला गेला, तर तासनतास बाहेर बसवून ठेवायचे. अशी खदखद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कार्यकारिणीच्या बैठकीत बोलून दाखविल्याने काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. पक्षश्रेष्ठींसमोरच हा प्रकार गेल्याने सारेच आवक झाले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक नुकतीच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानामध्ये आयोजित करण्यात आली होती. यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस आशीष दुआ, सोनल पटेल यांच्यासह ठाकरे सरकारमधील अनेक माजी मंत्री उपस्थित होते.बैठकीत नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखविली. ”गेली अडीच वर्षे आपले मंत्री फक्त पैसे खाण्याचे काम करीत असल्याचा आरोप करीत, त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. म्हात्रे यांच्या वक्तव्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी समर्थनही केले. त्यामुळे उपस्थित काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची तारांबळ उडाली.या प्रकारामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. विधान परिषदेत निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगबाबतही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुखे पक्षाला आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. तर हा विषय पक्षांतर्गत असल्याने माध्यमांसमोर बोलण्यास नकार देण्यात आला.मात्र पदाधिकाऱ्याचे समाधान झाल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
मध्यंतरी काँग्रेसच्या आमदारांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेत काँग्रेसच्या मंत्र्यांची तक्रार केली होती. त्यावेळेस राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या दाै-यावर येण्याचे आश्वासन दिले होते. पण सरकार कोसळले तरीही एकही वरिष्ठ नेता इकडे फिरकला नाही. त्यामुळे आमदारांपासून पदाधिका-यांपर्यंत सगळेच नाराज असल्याने पक्ष उभारी कधी घेणार असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत.