Latest Marathi News
Ganesh J GIF

आजीचा संयम सुटला आणि उकळते पाणी ओतले ४ वर्षांच्या नातवावर.. होळीच्या दिवशी नात्याला लागले ग्रहण

होळीच्या आनंदोत्सवाला धक्का देणारी धक्कादायक घटना नागपूरच्या कोराडी परिसरात घडली आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या चार वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून तो सुमारे 45 टक्के भाजला आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी परिसरातील रहिवासी चार वर्षीय ओम हरीश वांगे हा घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने होळी खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे घेऊन जात होत्या. दरम्यान, खेळताना ओमने पिचकारीतील रंग नकळत आजीच्या अंगावर उडवला. या घटनेमुळे सिंधू ठाकरे संतप्त झाल्या आणि क्षणाचाही विचार न करता त्यांनी हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट नातू ओमच्या अंगावर ओतली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

उकळते पाणी अंगावर पडल्याने ओम गंभीररित्या भाजला. तत्काळ कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मुलगा सुमारे 45 टक्के भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून त्यात हा प्रकार स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. होळी सारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या अमानवी प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी आजीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!