
टेम्पोमधून कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्याला व त्याच्या दोन कामगारांना मारहाण करुन अज्ञात चोरट्यांनी टेम्पोसह कपडे चोरुन नेले. चोरट्यांनी 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार रविवारी (दि.28) हडपसर येथील इंडस्ट्रीयल एरिया मध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला होता. हडपसर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असता हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी 24 तासात गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक केली आहे. वसीम युनुस खान (वय-27 रा. घास बाजार, बांद्रा टर्मिनस, बांद्रा), मोहम्मद मेहफुज शौकत खान (वय-25 रा. गोवंडी, शिवाजीनगर, मुंबई), मोहम्मद साकिब अय्याज खान (वय-24 रा. 90 फिट रोड, गोवंडी, मुंबई), गुफरान मिराज खान (वय-23 रा. 70 फिट रोड, गोवंडी, मुंबई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत ब्रिजेशकुमार राजमनी तिवारी (वय-39 रा. फकिरवाडी, न्यु लिंकिंग रोड, बेहराम बाग, जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तपास पथकाने घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, उपयुक्त माहिती मिळाली नसल्याने फिर्यादी यांच्याकडे एक वर्षापासून काम करणारा कामगार वसिम खान व त्याचा भाऊ मेहफस खान यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्या गोवंडी येथील सहकाऱ्यांच्या मदतीने टेम्पो व मलाचा अपहार करुन मुंबई येथे पाठवला असल्याचे निष्पन्न झाले.तपास पथकाने मुंबई येथे जावून आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेऊन गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी 24 तासात गुन्हा उघडकीस आणला. तसेच चार आरोपींना अटक करुन 12 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 5) आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अनिरुद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांच्या पथकाने केली.