
प्रेयसीच्या पतीचा खून करायला गेला स्व:तच ठार झाला
दोघांच्या मृत्यूचे कोडे सोडवण्यात पोलिसांना यश, त्या महिलेला पोलीसांच्या बेड्या
बार्शी – बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात १८ तारखेला दोन तरूणांचा मृतदेह आढळून आला होता. त्या घटनेचा तपास करत असताना वेगळेच सत्य समोर आल्याने पोलिसही चकित झाले आहेत.
गणेश अनिल सपाटे आणि शंकर उत्तम पटाडे यांचे मृतदेह महागाव येथील तलावात आढळून आले होते. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत शंकर पटाडे यांची पत्नी रुपाली हिचे मयत गणेश सपाटे याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. पती शंकर पटाडे हा दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. यामुळे आरोपी गणेश याने रुपालीशी संगनमत करून शंकर यांची हत्या करण्याचा कट रचला. १८ फेब्रुवारीला गणेश सपाटे याने आपल्या काही मित्रांसह शंकर पटाडे याला दारू आणि जेवण करण्यासाठी सोबत घेऊन गेला. यावेळी दोघेही नशेत होते. ते महागाव परिसरात गेले. येथील एका तलावाच्या पुलावर दोघांनी उतरून डान्स केला. यावेळी गणेशने शंकर यांना पुलावरून खाली उचलून टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो स्वत: देखील पाण्यात पडला. यामुळे रुपालीचा पती आणि प्रियकर दोघांचाही बुडून मृत्यू झाला. त्यांचा मित्र गणेश खरात याने दोघांना शोधण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंनी शोधाशोध केली, पण दोघेही सापडले नाहीत. या प्रकरणाच्या तपासावेळी रूपाली पटाडे हिने नवऱ्याला ठार मारण्यास गणेशला प्रवृत्त केले होते, अशी कबुली दिली आहे. पती शंकर वारंवार तिला त्रास देत असल्यामुळे ती अस्वस्थ होती आणि आपल्या प्रेमसंबंधात तो अडथळा ठरत असल्याने तिने पती शंकरचा खून करण्यास सांगितल्याची बाबही तपासातून समोर आली आहे. दोघांनाही पोहायला येत नसल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मयत गणेश सपाटे आणि कट रचणाऱ्या रूपाली पटाडे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने तिला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या विचित्र आणि गंभीर प्रकाराची परिसरात चर्चा होत आहे.