Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात पावसाचा हाहा:कार: कार्यालयांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून अनेक लोक अडकले आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केलं असून बोटीही बचाव कार्यात दाखल झाल्या आहेत. तसंच पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करत मदतकार्याला गती देण्यासोबतच नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.एकता नगर भागातील मदत कार्याचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. पाणी असलेल्या सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसंच पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालपासून पुण्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. पावसाने रात्रीपासून जोर धरला असून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. शहरातही धोधो पाऊस सुरु आहे. यामुळे पुणे शहरासह भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!