देवासमोर कान पकडत चोरट्याने देवाच्या दानपेटीवरच मारला डल्ला
अनोख्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, मंदिरातील घंटाही पळवली
दिल्ली दि ७(प्रतिनिधी) – आजकाल अनेक ठिकाणी चो-या दरोडे पडल्याच्या बातम्या आपण पाहत वाचत असतो, पण सध्या एका अनोख्या चोरीची चर्चा रंगली आहे. यात एका चोराने मंदिरात देवाचे दर्शन घेत देवाच्या दानपेटीवरच डल्ला मारला आहे. या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
दिल्लीतील मधु विहार परिसरातील मयुरध्वज अपार्टमेंटमधील मंदिरात ही चोरीची घटना समोर आली आहे. चोराने सोबतच मंदिरातील पितळी घंटा देखील चोरून नेली आहे. समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, एक चोर मंदिरात आल्यानंतर त्याने सुरूवातीला देवाला हात जोडले.नंतर त्याने मंदिरात काही संशयास्पद हालचाली केल्या,नंतर पुजास्थळाजवळ जात दानपेटीतून ३ लाख रूपयांची रोकड लंपास केली. त्याचबरोबर त्याने मंदिरातील पितळी घंटा देखील चोरली आहे. दानपेटी पडद्याआड असल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी स्पष्टपणे दिसत नाही. पण चोरट्याने दानपेटी फोडल्याचे समोर आले आहे. सकाळी लोक मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते तेव्हा ही चोरी निदर्शनास आली. देणगी पेटीचे कुलूप तुटल्याचे लोकांनी पाहिले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलीस या भागात कधीतरीच गस्त घालतात. त्यामुळे चोरीच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या आधारे लवकरच चोराला अटक करु असे पोलीसांनी सांगितले आहे.पण या चोराच्या मनोभावे चोरीची सध्या जोरात चर्चा होत आहे.