
महाराष्ट्रात ऑनर किलिंग भावाने केली बहिणींची हत्या
डोंगरावरून २०० फूट खोल दरीत ढकलत केली हत्या, बाहेर फिरायचा बहाणा आणि...
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. बहिणीच्या प्रेमप्रकरणामुळे चुलत भावानेच २०० फूट उंच डोंगरावरून खाली ढकलून तिची हत्या केली आहे.
मृत मुलीचे नाव नम्रता गणेश शेरकर आहे, जी १७ वर्षांची होती. तसेच, तिच्या सख्या चुलत भावाचे नाव ऋषिकेश तानाजी शेरकर आहे, जो २५ वर्षांचा आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नम्रताचे एका मुलावर प्रेम होते. त्यातूनच तिचे घरच्यांशी खटके उडत होते. यामुळे घरच्यांनी तिला शहागड येथून वळदगाव येथे चुलते तानाजी शेरकर यांच्याकडे पाठवले होते. घटनेच्या दिवशी नम्रता आणि चुलत भावात वाद झाला. काही वेळाने चुलत भाऊ ऋषिकेश याने बाहेर फिरायला जाऊन येऊ असे सांगत नम्रतास दुचाकीवरून परिसरातील खवड्या डोंगर येथे आणले. यावेळी डोंगराच्या टोकावर असणा-या सर्वात अवघड जागेवर ऋषिकेशने तिला नेले. येथे गप्पा मारण्याचा बहाणा करत ऋषिकेशने बेसावध नम्रतास अचानक धक्का देऊन डोंगरावरुन खाली ढकलले. तब्बल २०० फुट उंचावर खाली पडल्याने नम्रताचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथून ती घर सोडून निघून गेली होती. त्यावेळी तिने घरच्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही शहागड पोलिसांना दिली होती.
भावाने बहिणीची हत्या केल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोक व पोलिसांच्या पथकाने मुलीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.