Latest Marathi News
Ganesh J GIF

भयंकर! ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा डोक्यात दगड घालून खून

प्रियकराची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कबुली, एक लाख रूपये आणि ती धमकी ठरली हत्येचे कारण, घाटात काय झाले?

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. सतत १ लाख रुपयांची मागणी करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीचा खून केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

दिपाली गणेश आस्वार असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून सुनील सुरेश खंडागळे असे हत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली व सुनील यांच्यात प्रेम संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडत होते. गुरुवारी सुनीलने वडिलांची दुचाकी घेऊन कन्नड गाठले आणि दिपालीला भेटले. दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. संध्याकाळनंतर ते दौलताबाद घाटात गेले. तिथे दिपालीने सुनिलला एक लाख रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास “बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकी दिली. या धमकीने संतप्त झालेल्या सुनीलने आपले भान हरपून रागाच्या भरात दिपालीचे डोके दगडावर आपटून तिचा जागीच खून केला आणि तिचा मृतदेह घाटात ढकलून दिला. पण भानावर आल्यानंतर सुनीलने शिऊर थेट पोलीस ठाणे गाठले आणि प्रेयसीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंब यांनी तत्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता काही वेळातच तो आढळून आला. नंतर ओळख पटवून मृतदेह दिपाली आस्वार हिचा असल्याची खात्री करण्यात आली. या घटनेने दौलताबाद आणि वैजापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी सुनील खंडागळेला शिऊर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!