
हाॅटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करत बेदम मारहाण
सेल्फीचा बहाणा करत गाडीत फरफटत नेले, पुलावर बेदम मारहाण करत फेकले, भाग्यश्रीच्या मालकासोबत नेमकं काय घडलं?
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री आणि त्याचे मालक नागेश मडके सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. पण आता हॉटेल भाग्यश्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हॉटेल समोर उभे होते. त्यावेळी एक चारचाकी तिथे आली. त्या गाडीमधील लोकांनी सेल्फीच्या बहाण्याने नागेश मडके यांना बोलावून घेतले.यावेळी नागेश मडके हे कारजवळ गेले. कारमध्ये बसलेल्या आरोपींनी मडके यांनी कारच्या खिडकीजवळ बोलावलं. ते जवळ येताच आरोपींनी मडके यांना खिडकीत अडकवलं आणि त्यांचं अपहरण केलं. अपहरणकर्त्यांनी त्यांना पाच किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. त्यांच्यापासून सुटका करुन घेतल्यानंतर स्वतः मडके यांनी याबाबत माहिती दिली आहे. गाडीत असणाऱ्या पाच अपहरणकर्त्यांनी मला बेदम मारहाण केली. यावेळी ह्याला मारुन टाकू, मरेपर्यंत सोडायचे नाही.ह्याला मारुन टाकायचं अन् पुलात फेकून द्यायचं अशी धमकी ते देत होते, अशी आपबिती मडके यांनी सांगितली आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी मडके यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याची आॅडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि वाहन क्रमांकाच्या आधारे तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान मारहाणीचा प्रकार समोर आल्याने हाॅटेल व्यावसायिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
हाॅटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे नागेश मडके यांनी सांगितले आहे.