
पुण्यात दिवसाढवळ्या भरचाैकात पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला
पत्नी गंभीर जखमी, पत्नीवर आरोप करत पतीचा हल्ला, या कारणामुळे तलाकची मागणी
पुणे – पुण्यातून अनेक धक्कादायक बातम्या समोर येताना दिसून येत आहेत. तलाक का देत नाही म्हणत तरूणीला जीवे मारण्याचा भरसकाळी प्रयत्न केला. या हल्ल्यामुळे पुणे शहर हादरून गेलं आहे. विशेष म्हणजे भरचाैकात ही धक्कादायक घटना घडली आहे.
सलमान रमजान शेख आणि हुजेफा आबेद शेख अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी नाणेकर चाळ, भारतनगर, पिंपरी येथील २२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिने याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामावर असताना आरोपी दुचाकीवरून घटनास्थळी आले. आरोपी सलमानने ‘तलाक का देत नाहीस,’ या कारणावरून फिर्यादीचे कामावरील सहकाऱ्यांबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तिच्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार केले. प्रतिकार करताना तिच्या डोक्यावर, गालावर आणि कानामागेही वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी सांगितले की, सलमान शेख आणि फिर्यादी हे पतीपत्नी असून त्यांचे पटत नसल्याने फिर्यादी या आईकडे पिंपरीला राहतात. थेरगाव येथे नोकरी करतात. सलमान शेख याचा पिंपरी भाजी मंडईमध्ये भाजीपाला विक्रीचा गाळा आहे.
आरोपी सलमान रमजान शेख आणि हुजेफा आबेद शेख यांना काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक नाईक निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.