नवरा आणि सासऱ्याने 5 वर्ष तोडले लचके, 16 वर्षांची असताना बहिणीनेच केला होता सौदा,मन हेलावून टाकणारी स्टोरी
छत्तीसगडमध्ये एका पीडितेच्या बाबतीत अत्याचाराची परिसीमा गाठली गेली आहे. 16 वर्षांच्या मुलीला तिच्या चुलतबहिणींनी हरियाणातल्या 30 वर्षांच्या व्यक्तीला विकलं.त्यानंतर गेली 5 वर्षं तिला खरेदी करणारा व त्याचे वडील यांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. काहीच महिन्यांपूर्वी तिची त्यांच्या तावडीतून सुटका झाली. त्यानंतर तिनं पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणात तिची विक्री करणाऱ्या बहिणीला पोलिसांनी अटक केलीय; मात्र ते आरोपी पिता-पुत्र अजूनही पोलिसांना सापडले नाहीत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या 21 वर्षांची असलेली मीरा (नाव बदललंय) एका बाळाची आई असून, छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात तिच्या आई-वडिलांसोबत राहते. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिची चुलतबहीण आणि 2 आरोपींवर आयपीसीच्या अंतर्गत तस्करी, बलात्कार, धमकी या आरोपांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे, असं कबीरधामचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी तिच्या चुलत भावालाही अटक केलीय व इतर 2 आरोपींना पकडण्यासाठी हरियाणाला पोलिसांचं एक पथक रवाना करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. गुन्ह्याच्या वेळी मीरा अल्पवयीन होती. त्यामुळे सगळ्या आरोपींवर पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल होतील असं पोलिसांनी म्हटलंय.
कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी 2018 मध्ये मीरा काम शोधत होती. तेव्हा मामाची 32 वर्षीय मुलगी मध्य प्रदेशात राहत होती. तिनं मीराला दिल्लीत काम मिळेल असं सांगितलं. डिसेंबरमध्ये मीरा तिच्यासोबत दिल्लीत गेली. तिथे एका डॉक्टरांच्या घरी घरगुती कामासाठी ठेवण्यात आलं; मात्र एकटेपणा आणि कठीण परिस्थितीमुळे मीरानं पुन्हा घरी परतण्याचं ठरवलं. मीराच्या बहिणीनं मात्र तिला घरी पाठवण्याऐवजी तिला रोहतकमधल्या एका व्यक्तीला विकलं. त्या माणसाच्या तावडीत सापडल्यावरच मीराला आपली विक्री केल्याचं समजलं. एका मंदिरात त्याने तिच्याशी जबरदस्तीनं लग्नही केलं. त्यानंतर तिचा नवरा आणि त्याचे वडील या दोघांनी तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. तिला नोकरासारखं वागवलं. तिला एक मूलही झालं. तिथून पळून जाण्यासाठी तिने त्यांच्याशी सलोख्यानं वागायला सुरुवात केली. आपल्या कुटुंबीयांशी बोलण्यासाठी तिनं त्यांचं मन वळवलं; पण केवळ त्यांच्या उपस्थितीतच बोलण्याची परवानगी त्यांनी दिली. त्यानंतर बरेच दिवस ती शांत राहिली. अखेर एके दिवशी तिनं संधी पाहून वडिलांना पळून जायच्या नियोजनाबद्दल सांगितलं.
रिपोर्टनुसार, मीराचा पती आणि त्याचे वडील बांधकाम कंपन्यांमध्ये कंत्राटदार म्हणून काम करत होते. तिनं त्यांना सांगितलं, की तिच्या गावात खूप मजूर आहेत आणि ते दर निश्चित करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात मजूर आणण्यासाठी तिच्यासोबत तिथं जाऊ शकतात. त्यानेही होकार दिला आणि मीराला तिच्या मुलासह नोव्हेंबरमध्ये तिच्या गावी नेलं. गावात आल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पीडितेच्या पालकांनी त्याला गावाबाहेर हाकलून दिलं; पण तो मुलाला घेऊन गेला.
काही दिवसांनी ते दोघं पिता-पुत्र तिला परत नेण्यासाठी आले. खोट्या साक्षी-पुराव्यांच्या आधारावर पोलिसांत तक्रारही दिली; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मीराच्या 2 वर्षांच्या मुलाला तिच्याकडे सोपवण्यात आलं. मीराने तक्रारीमध्ये तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.