
डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने वार करत पत्नीची हत्या
खून करून गावात हजर होत मुलींकडे लक्ष ठेवण्याची केली विनंती, हत्याकांडाने खळबळ, रोहिणीच्या हत्येचे कारण काय?
कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे पतीने पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकल्यानंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुनाचे कारण समजू शकले नाही. पण यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रोहिणी पाटील असे मृत महिलेचे नाव तर प्रशांत पाटील असे पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत याचा भादोले ग्रामपंचायत गाळ्यात दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्याचा आठ वर्षांपूर्वी ढवळी येथील रोहिणी हिच्याशी विवाह झाला. त्यांना एक तीन वर्षांची व एक सहा वर्षांची अशा दोन मुली आहेत. प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी समवेत तिच्या माहेरी ढवळी येथे वडील आजारी असल्याने आठवडाभरापासून ये-जा करत होता. रात्री आठच्या सुमारास परत येत असताना वारणा नदीचा पूल ओलांडल्यानंतर गावाच्या बाजूस असणार्या ओढ्याजवळ गाडी थांबवून प्रशांतने रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि कोयत्याने डोकीत सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने रोहिणी जागीच कोसळली. डोक्यात व मानेवर वर्मी वार झाल्याने रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी, प्रशांत हा भादोल गावातील त्याच्या घरी गेला, तेथे लोकांसमोर त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिल्याचे समजते. एवढंच नव्हे तर आता मी ५ -६ महिने येणार नाही, मुलींकडे लक्ष ठेवा असंही त्याने गावकऱ्यांना सांगत तिथून पळ काढला. या खुनाची माहिती समजताच वडगाव पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही खुनाची घटना समजताच रोहिणीचे माहेर असणार्या ढवळी येथील शेकडो ग्रामस्थ व नातलगांनी भादोले येथे धाव घेतली. संतप्त झालेले हे सर्वजण संशयित प्रशांत याचे गॅरेजसमोर जमले होते. पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवले.
पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयित आरोपी प्रशांत पाटील याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांतने हा खून नेमका का केला, त्यामागे काय कारण होतं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.