
प्रेमात अडथळा ठरत होता पती, रचला पतीच्या हत्येचा कट
पतीला वैतागलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्येचा कट, गेटवर पती दिसताच प्रियकराने केला वार पण....
लातूर – पती छळ करतोय असे प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकराने तिच्या नवऱ्याचा खून करण्याच्या उद्देशाने कत्तीने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास लातूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या गेटवर घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सचिन सूर्यवंशी असे हल्ला झालेल्या पतीचे नाव आहे. भक्ती सूर्यवंशी आणि अविनाश सूर्यवंशी असे हल्ला करणाऱ्या पत्नीचे आणि तिच्या प्रियकराचे नाव आहे. दीपक दत्तू खेडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. भक्ती आणि अविनाश यांचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती सचिनला या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली होती. सचिन मजुरीला बाहेर जाताना पत्नी भक्तीला घरात बंद करून कडी लावून जात असल्यामुळे भक्ती वैतागली होती. भक्तीने प्रियकर अविनाशला पतीकडून छळ होत असल्याचे सांगून त्याला संपवण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारी रात्री म्हाडा कॉलनीतील कमानीनजीक बाभळगाव रोड परिसरात अविनाशने धारदार चाकूने सचिनच्या तोंडावर आणि छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सचिन महादेव सूर्यवंशी गंभीर जखमी झाला. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीच्या मानेवर, छातीत आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ती सतत अडखळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पुढील तपासात तिने अखेर आरोपी अविनाश सूर्यवंशीचे नाव कबूल केले.
पोलिसांनी तत्काळ आरोपी अविनाश नंदकिशोर सूर्यवंशी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक रेडेकर करत आहेत.