
मी कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेल
शिंदे गटाच्या मंत्र्याचा एकनाथ शिंदेना इशारा, फडणवीस यांच्यावरही टिका, या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ
मुंबई – महायुती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचे मंत्री आता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्ये करत असल्यामुळे पक्षातील नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे. आता मंत्री संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे.
संजय राठोड यांनी शिंदेंवर जोरदार टिका केली असली तरी उद्धव ठाकरेंबद्दल मात्र आदर व्यक्त केला आहे. फडणवीस सरकारने नुकतेच मंत्रालयातील सर्व खात्याचे प्रगती पुस्तक जाहीर केले यात संजय राठोड यांच्या खात्याचा कारभार असमाधानकारक असल्याचे समोर आले होते. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “मी परीक्षा दिलीच नाही, मग मी नापास कसा? आणि माझ्या पेपरची तपासणी कोणी केली?” यावरून त्यांनी फडणवीस सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. पुढे बोलताना त्यांनी अजून एक खळबळजनक विधान केले. मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितले संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही, मी तुम्हाला नापास करेल. तुम्हाला गोष्ट सांगत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे आजही चांगले संबंध आहेत आणि मला उद्धव ठाकरे यांचे फोन सुद्धा येतात, असेही संजय राठोड स्पष्ट केले. शिंदेंसोबत गेलेल्या सर्वच आमदार, मंत्र्यांशी उद्धव ठाकरेंचे तणावाचे संबंध आहेत. त्यांचा उल्लेख ठाकरेंकडून गद्दार असाच केला जातो. मात्र, राठोड यांनी मात्र एकदम उलट प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणी गंभीर आरोप झाल्यानंतर ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते.
भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना या वक्तव्याबाबत विचारले असता मात्र त्यांनी घुमजाव केले. मी असे बोललोच नाही, असे राठोड म्हणाले. मात्र, राठोड यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावे लागेल.