
‘मी बलात्कार केला नाही आमचे संबंध सहमतीने झाले’
अटक केलेल्या दत्ता गाडेचा धक्कादायक खुलासा, बलात्कार प्रकरणात ट्विस्ट
पुणे – पुण्यात स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केली आहे. पण अटक केल्यानंतर पोलीसांच्या चाैकशीत दत्ता गाडेने धक्कादायक खुलासा केला आहे.
दत्ता गाडेच्या या दाव्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. त्याला अटक झाल्यानंतर मी तरूणीवर अत्याचार केलेला नाहीये. आमचे संबंध सहमतीने झाले, असा दावा केल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. पीडीत तरूणी आणि आरोपी हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जर दत्ता गाडे खरं बोलत असेल तर पिडीत तरूणी आरोपीवर असे खाेटे आरोप का करत आहे, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. पण जर सगळ्या गोष्टी सहमतीने झाल्या होत्या तर तो पळून का गेला होता, तसेच तरूणीने पोलिसात तक्रार का दाखल केली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान स्वारगेट पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला पुण्यात आणण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाती लागला. आरोपीला आज दुपारी तीननंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपीला सध्या लष्कर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तरुणीने योग्य वेळी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे.