Latest Marathi News
Ganesh J GIF

‘मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे’; दहीहंडीच्या दिवशी पोलिसांना आलेल्या कॉलचा अखेर खुलासा

पुणे –  मी कमला नेहरू हॉस्पिटलजवळ एकटा असून ३० ते ४० लोक तलवार घेऊन फिरत आहेत, त्यांच्याजवळ दारुच्या बॉटल आहे. मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे, असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. शहरात दहीहंडी उत्सव रंगात आला असताना असा कॉल आल्याने पोलिसांची एक धावपळ उडाली. बीट मार्शल तातडीने घटनास्थळी गेले. परंतु, तेथे असला काही प्रकार दिसून आला नाही. त्यांनी कॉल करणार्‍याला फोन केल्यावर त्याचा फोन बंद आढळून आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.

पोलिसांनी तांत्रिक माहिती घेतली असता तो फोन एका महिलेच्या नावावर असल्याचे लक्षात आले. त्या महिलेशी संपर्क साधल्यावर तिने बहिणीचा मुलगा रोहित मुकेश चव्हाण (वय २२, रा. मंगळवार पेठ) हा हे सीम वापरत असल्याचे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दहीहंडीच्या दिवशी कामावर जात असताना रस्त्यावर गर्दी दिसल्याने कॉल केला. नंतर मोबाईल बंद करुन कामावर निघून गेल्याचे सांगितले. पोलीस नियंत्रण कक्षाला जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्याचे निष्षन्न झाले. त्यामुळे बीट मार्शल विवेक पाटील यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली असून रोहित चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, तात्काळ पोलीस मदतीसाठी १०० व ११२ यांचा वापर करावा. विनाकारण, मजा म्हणून व त्रास देण्याच्या हेतूने खोटे कॉल केल्यास त्यांचेवर कठोर कारवाई होऊ शकते. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, अन्सार शेख, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार गौस मुलाणी यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!