
धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या एसआयटीकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्याच्यावर शिर्डीसह नगर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्य संख्येनं गुन्हे दाखल झाल्याने खरात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.

दरम्यान, दैवी शक्ती असल्याचं सांगून अनेकांचं भविष्य सांगणाऱ्या खरातने आता स्वत:चं भविष्य सांगितलं आहे. त्याने आपल्या मृत्यूबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. पोलीस चौकशीत त्याने हतबल प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी इथून बाहेर पडेन, असं वाटत नाही. माझं मरणं इथेच (जेलमध्ये) आहे’ असं वक्तव्य खरात याने केलं आहे. तसेच त्याने विशेष तपास पथकाद्वारे सुरू असलेल्या चौकशीत खरातने फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तपासात फसवणुकीची कबुली

अशोक खरात याच्यावर आतापर्यंत १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. SIT कडून सुरू असलेल्या सखोल चौकशीत त्याने फसवणुकीचे गुन्हे कबूल केले आहेत. लोकांच्या भोळसट श्रद्धेचा गैरवापर करून त्याने केवळ आर्थिक लूटच केली नाही, तर अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीदरम्यान पोलिसांच्या प्रश्नांचा ससेमिरा वाढल्यानंतर खरातने गुन्ह्यांची कबुली देत आता सुटका होणं शक्य नसल्याचं मान्य केलं आहे.
लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार

खरातवर सर्वात गंभीर आरोप म्हणजे धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने केलेले महिलांचे लैंगिक शोषण. अनेक पीडित महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या असून, ‘आध्यात्मिक शक्ती’ मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. याव्यतिरिक्त, त्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही उघड झाले आहे. खरातच्या अटकेनंतर आता अनेक नवीन तक्रारदार समोर येत असून, तपासात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात देखील कारवाईचं पाऊल उचललं आहे. पोलिसांनी फरार असलेल्या कल्पना खरात याचे एक बँक खाते ईडी कडून सील करण्यात आलं आहे. या बँक खात्यांमधील गेल्या तीन वर्षापासूनच्या व्यवहारांची इडीकडून पडताळणी केली जात आहे.

