
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाबाबत दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणात ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना निलंबित करून त्यांना पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.डॉक्टरांना अटक केल्यानंतर या प्रकरणावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांवर हफ्ते घेतल्याचे गंभीर आरोप केले. पण या आरोपांबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार धंगेकरांना आव्हान दिले आहे.उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आमदार धंगेकर यांनी केलेल्या आरोपांवर आपले मत व्यक्त केले आहे. प्रसार माध्यमांसमोर ते म्हणाले की, एका वृत्तवाहिनीला पाहिले की, एका कोणत्या तरी पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असे सांगितले. पण पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय नेत्याने एका पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केला असेल तर त्याचा पुरावा दिला पाहिजे. नुसता आरोप करण्यात काही अर्थ नाही. कारण पुरावे दिले तर त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम हे राज्य सरकारचे आहे, असे म्हणत त्यांनी धंगेकरांचे नाव न घेता, त्यांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांबाबतचे पुरावे देण्याचे आव्हान केले आहे.
पुणे अपघात प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात आला आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्यावेळी आम्ही विरोधी पक्षात असतो, तेव्हा आम्ही म्हणतो की, राजकीय दबाव आहे. ज्यावेळी ते विरोधी पक्षात असतात, त्यावेळी ते तसे बोलतात. त्यामुळे राजकारण्यांकडे तसे बोलण्याची पद्धत आहे. राजकीय दबाव असण्याचे कोणतेही कारण नाही. कारण कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, असे आम्ही आधीच सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला वेगळे वळण लागले असून या प्रकरणी आज सोमवारी (ता. 27 मे) काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते मोहन जोशी आंदोलनात सहभागी होते. या आंदोलनावेळी रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे आक्रमक झाले आहेत. पुण्यातील पब, बारमध्ये अवैध प्रकार सुरु आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन धंगेकर आणि अंधारेंनी तक्रार केली. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वसुलीची यादीच वाचली. पुण्यात पब आणि बारमध्ये पोलिसांकडून वसुली होते. दर महिना 70 ते 80 लाखांचा हप्ता घेतात, असा आरोप धंगेकर यांनी केला आहे. लेट नाइट, द माफिया, एजंट जॅक्स, डॉलर, बॅक स्टेज यांच्याकडून हप्ता वसुली होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.