
‘मी प्रेस घेतली तर खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही’
पोलीस अधिकाऱ्याची विद्यमान खासदारांविरोधात वादग्रस्त पोस्ट, कोण आहेत 'ते' खासदार, वाद काय?
बीड – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून एक आरोपी अजूनही फरार आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. पण आता पोलीस आणि खासदार यांच्यातील वाद समोर आला आहे.
बीड पोलीसमधील एका अधिकाऱ्यांनी हे विधान केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी ही वादग्रस्त पोस्ट केली आहे. बीड पोलीस प्रेस ग्रुपवर त्यांनी शनिवारी एक पोस्ट केली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीत गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. त्यानंतर शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी बीड पोलिसांच्या ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट केली आहे. यामध्ये ”या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही, मी प्रेस घेतली तर असं म्हटलं. या पोस्टनंतर खासदार कोण?, अशी विचारणा देखील काही पत्रकारांनी ग्रुपवर केली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी गणेश मुंडे यांना या ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे. या पोस्टनंतर ज्या खासदारासाठी ही पोस्ट केली, ते अन्य कोणीही नसून खासदार बजरंग सोनवणेतच असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी खासदार सोनवणे नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून एक आरोपी अजून फरार आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी बजरंग सोनावणेंनी केली आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना १४ दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. अद्याप या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे.