Latest Marathi News
Ganesh J GIF

माझ्या नादी लागला, तर तुझी विकेट टाकेल? अशी धमकी देत टपरी चालकावर कोयत्याने वार, आरोपीला अटक

माझ्या नादी लागला, तर तुझी विकेट टाकेल? अशी धमकी देऊन टपरी चालकावर लोखंडी कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर परिसरात गुरुवारी (ता.१२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश गोपीचंद दरेकर (वय ३५) असे जखमी झालेल्या टपरी चालकाचे नाव आहे. तर विनायक लावंड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश दरेकर हे एक टपरी चालक आहेत. दरेकर यांची पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत डी. के. वाईन्सजवळ एक पानाची टपरी आहे. आरोपी विनायक लावंड हा गुरुवारी (ता.१२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शैलेश दरेकर यांच्या टपरीच्या ठिकाणी आला. त्यानंतर आरोपी फिर्यादी दरेकर यांना म्हणाला की, तुझा भाऊ अभिजीत यास समजून सांग, माझ्या नादाला लागू नको, मी कोण आहे. हे सगळ्या लोणी गावाला माहित आहे. माझ्या नादी लागाल, तर मी तुझी विकेट टाकेल? अशी धमकी देत फिर्यादी यांना टपरीच्या बाहेर ओढून काढले.

आरोपी विनायक लावंड याने कमरेला खोचलेला लोखंडी कोयता काढत फिर्यादी दरेकर यांच्या उजव्या हाताच्या पोटरीवर मारला. त्यामुळे फिर्यादींच्या हातातून रक्तस्त्राव होवून त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने लोखंडी कोयता हवेमध्ये फिरवत शिवीगाळ केली. कोण माझ्या नादी लागाला, तर मी त्याला जिवंत सोडणार नाही? अशी धमकी दिली व परिसरात दहशत निर्माण करुन निघून गेला. याप्रकरणी शैलेश दरेकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विनायक लावंड याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड न्याय संहिता कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१ व भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!