मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचा रोजच आमनासामना होत आहे. आजही विधानपरिषदेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सभापती नीलम गो-हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर भडकलेल्या पहायला मिळाल्या. त्यांनी पाटलांना चांगलेच खडसावले आहे.
शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी विरोधक यांच्यात गोंधळ झाला. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमकपणे मुद्दा मांडला. यावेळी ‘जर दादागिरी केली जाईल तशी भाषा असेल तर आम्हाला ही उत्तर देता येईल’’ असं पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानावर दानवे यांनी आक्षेप घेतला घेत पाटील यांनी माफी मागण्याची मागणी केली. पण गुलाबराव पाटील यांनी आपण मंत्र्याचे सहकारी आहोत अस म्हणत वाद घातला. त्यामुळे गो-हे यांनी तुमच्या विभागाचा प्रश्न नाही, दीपक केसरकर यांच्या विभागाचा हा प्रश्न आहे. तुम्ही हातवारे करून काय बोलताय, ही सभागृहातली पद्धत नाही. तुम्हाला ताकीद देतंय गुलाबराव…खाली बसा. छातीवर हात देवून काय बोलताय, तुम्ही मंत्री असाल तर घरी, असं म्हणत गुलाबराव पाटलांना सुनावले.अखेर चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत पाटलांना खाली बसवलं.
अधिवेशन चालु झाल्यापासून सभागृहात वारंवार विरोधक सत्ताधारी आमनेसामने येत आहेत. पण मंत्री मात्र उत्तर देताना चाचपडत आहेत त्यामुळेच इतरांना मध्यस्थी करावी लागत आहे. पण यावेळी नियमांचा भंग होत असल्याने सभापतींनी हस्तक्षेप करत सुनावले आहे.