
राज्यभरात खळबळ उडालेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत आज संपल्याने त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे.

न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले आहे. तेथे त्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे.

गेल्या १४ दिवसांपासून विशेष तपास पथक या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासांतही SIT ने खरातची कसून चौकशी केली. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी काल रात्री उशिरा खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात यालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. बापाच्या या काळ्या कारनाम्यात मुलाचा नेमका सहभाग किती, याचा तपास आता पोलीस करत आहेत.


