
पुण्यात गुंडाचा हाॅटेलचालकाला जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न
आमचे कोणी वाकडे करू शकत नाही म्हणत गुंडांची दादागिरी, व्हिडीओ व्हायरल, पुण्याचा बिहार झालाय का?
पुणे – पुण्यात स्वारगेट एसटी बस आगारमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यामुळे पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच भारती विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी एका हॉटेलचालकाला बेदम मारहाण करत पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
हॉटेलचे मालक अमित खैरे हे हल्ल्यातून बचावले आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार, तरुणांच्या दोन ग्रुपमध्ये हाॅटेलच्या गेटसमोर मारामारी झाली होती, तसेच वाद सुरु होता. त्यामुळे खैरे यांनी या तरुणांना’आमच्या हॉटेल समोर भांडणे करू नका’, असं सांगितले. पण यामुळे संतापलेल्या या गुंडांनी खैरे यांच्यावरच हल्ला केला.त्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांनी तरुणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. ते परत येत असताना तरुणांनी त्यांना रस्त्यात अडवत बाटलीतून आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत होते. ते तरुण गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने हॉटेलचालकाने दुचाकी तिथेच टाकून पळ काढला, त्यामुळे ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. गुन्हेगारांनी त्या हॉटेलचालकाची दुचाकीच पेटवून दिली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा प्रकार गंभीर असतानाही पोलिसांनी किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर हॉटेल मालकाला मारहान झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. क्षुल्लक कारणास्तव मारहाण, दहशत पसरवण्यासाठी हातात कोयता घेऊन फिरणं, गाड्या फोडणं, मारहाण करणं, अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत.