पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. काल (दि.२०) बाणेर-पाषाण रोडवर डिजिटल कंटेन्ट क्रिएटर महिलेला पाठलाग करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आपल्यावर ओढवलेल्या या बिकट प्रसंगाची माहिती त्या महिलेने व्हिडिओतून समाजमाध्यमांवर दिली होती. जेरीलन डिसिल्वा यांनी व्हिडीओमध्ये दावा केला की, आरोपीने त्यांचे केस ओढून तोंडावर आणि नाकावर दोनवेळा बुक्का मारला. ज्यामुळे नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या दोन लहान मुलांसमोर या अज्ञात कारचालकाने त्यांना मारहाण केली तसेच तिचे केसही ओढले होते. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.चारचाकी वाहनातील आरोपी स्वप्नील केकरे आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी स्वप्नील याची पत्नी घटना घडली तेव्हा गाडीतच उपस्थित होती, त्यामुळे तिलाही सहआरोपी करण्यात आले आहे.डीसीपी विजयकुमार मगर यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, हा गुन्हा चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून आम्ही पुढील तपास करत आहोत.