
धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पत्नीची हत्या
लोणी काळभोरमधील शेतकऱ्यांच्या हत्येचे गुढ सोडवण्यात पोलिसांना यश, खुनी पत्नी आणि प्रियकराला अटक
पुणे – पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंगणात झोपलेल्या रवींद्र काशिनाथ काळभोर या व्यक्तीचा डोक्यात दगडाने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली होती. आता याबाबत धक्कादायक सत्य समोर आले आहे.
रवींद्र काशिनाथ काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर शोभा रविंद्र काळभोर व गोरख त्र्यंबक काळभोर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती येथे रविंद्र काशीनाथ काळभोर हे त्यांच्या राहत्या घराबाहेर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. रवींद्र काळभोर यांचा कोणीतरी खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासाला सुरुवात केली असता, शोभा काळभोर यांचे गोरख काळभोर यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला. शोभा आणि गोरख या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. मात्र या दोघांमध्ये मयत रवींद्र काळभोर अडथळा ठरत होते. त्यामुळे या दोघांनी मिळून रवींद्र काळभोर यांचा काटा काढण्याचे ठरवले. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमरास रवींद्र काळभोर हे पलंगावर झोपलेले असताना, दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्याच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. क. १०३, ३(५) महा. पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा प्रकार हा अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ठ स्वरुपाचा असताना देखील अवघ्या ३ तासांच्या आत पोलीसांनी आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली आहे.
ही कामगिरी पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अनिल जाधव, पोलिस उप निरीक्षक उदय काळमोर, पोलिस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलिस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पोलिस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलिस उप निरीक्षक पुजा माळी, पो. हवा. देवीकर, शिंदे, वणवे, नागलोत, मेमाणे, पो. शि. विर, शिरगीरे, कर्डीले, गाडे, कुंभार, सोनवणे, बनकर, जोजारे, धुमाळ, महिला पोलीस हवा, नवले, होले, म.पो.शि. उषा थोरात यांनी केली आहे.