पुण्यात महिलेने छेड काढणाऱ्या तरुणाला दिला बेदम चोप
महिलेचा तरुणाला चोप देतानाचा व्हिडिओ व्हायरल, कानाखाली लगावताच तरुणाला घडली अद्दल
पुणे – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. पण हे असताना छेडछाडीच्या घटना मात्र सर्रास घडत असतात. त्यामुळे वारंवार महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत येत असतो. पण पुण्यात मात्र एका महिलेने छेड काढणाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लष्करे या आपल्या मुलासह बसमधून प्रवास करत होत्या. यावेळी एका दारुड्या व्यक्तीने त्यांची छेड काढली. यावेळी प्रिया यांनी रुद्रावतार धारण करत त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. त्या पुढील काही मिनिटं त्या मद्यधुंद व्यक्तीला मारत होत्या. यानंतर व्यक्तीला शनिवारवाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले. पण पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता.त्यामुळे अर्धा तास प्रिया यांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले.त्यानंतर त्यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क करत घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर काही वेळात पोलीस चौकीत आले. आणि त्यानंतर संबंधित तरूणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तरूणाने बसमधून उतरताना महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यामुळे प्रिया यांनी त्याच्या कानशिलात लगावली. जवळपास एक दोन मिनिट त्या तरूणाच्या कानशिलात लगावत होत्या. दरम्यान मद्यपी हा मूळचा मंगळवार पेठेतील आहे त्याचे गुन्हेगारीचं बँकग्राऊंड पण नाही. संबंधित महिलेला बसमधून उतरताना चुकून धक्का लागल्याचे त्याने पोलिसांना लिहून दिले आहे. महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी एकजुट होऊन आवाज उठवला, तर या प्रकाराच्या घटनांना थांबवता येईल. असे प्रिया लष्करे म्हणाल्या आहेत. पण या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
गर्दीमध्ये अनेकदा महिलांना पुरुषांच्या वासनांध नजरा सहन कराव्या लागतात. अनेकदा तर गर्दीची संधी साधत नको त्या ठिकाणी स्पर्शही करण्याचा प्रयत्न होतो. या सर्व गोष्टींचा महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे या घटनेनंतर एकही पुरूष किंवा महिला त्यांच्या मदतीला धावून आल्या नाहीत. प्रिया यांचा पती आणि कंडक्टर एवढेच फक्त पोलीस चाैकीला हजर झाले.