
हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवून तुम्ही भाई समजता का असे म्हणत अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच त्यांचा पाठलाग करुन आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून हातातील हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांसह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) रात्री पावणे अकराच्या सुमारास जांभळे वस्ती येथे घडला.
याबाबत 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश चव्हाण, ऋषीकेश कांबळे, अतुल जाधव, कृष्णा गायकवाड, आदित्य गायकवाड, अथर्व जाधव, संजय गायकवाड, सक्षम (पूर्ण नाव माहित नाही सर्व रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा) यांच्यावर भान्यास 189(2), 189(4), 351 (3), महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंड अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यश, ऋषीकेश, कृष्णा हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा व त्याचे मित्र जांभळे वस्ती येथील मोकळ्या मैदानात गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीचे आरोपी दुचाकीवरुन हातात लाकडी बांबू व लोखंडी धारदार हत्यारे घेऊन आली. फिर्य़ादीच्या मित्राचा सुड घेण्याच्या व गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना शस्त्राचा धाक दाखवला. तसेच तुम्ही भाई समजता का असे म्हणून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी याने आरोपीला धक्का देऊन तिथून पळून गेला. त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग करुन आम्ही इथले भाई आहोत असे बोलून हातातील बांबू व शस्त्र हवेत फिरवून दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.