
ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा मोठा दावा केला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य केले आहे.

पवार यांनी नमूद केले की, वारकरी संप्रदायसारख्या समतेच्या चळवळीतही काही धर्मांध प्रवृत्ती शिरकाव करत आहेत. त्यांच्या मते, संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा प्रवृत्तींची नोंद घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवारांनी केलेल्या या दाव्याचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

याचबरोबर वारकरी परंपरेत पुरोगामी विचार मांडणाऱ्या लोकांची गरज अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, सध्या सुमारे 40 जण असे आहेत जे कीर्तन आणि प्रवचनातून प्रगत विचार मांडतात. मात्र या प्रबोधनाच्या प्रवाहात महिलांचा अभाव असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, महिला अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे पार पडत असून, आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे

